ह्मा जगांत बरें करून घेण्यास बुद्धीपेक्षां आंगच्या चातुर्याची जास्त जरूरी लागते. परंतु ज्यांना तें स्वभावतः नसतें, त्यांना तें सहज प्राप्त होत नाहीं. तरी पण, प्रायः इतर लोकांना काय वाटतें ह्याचा विचार केल्यास, तें थोडेंबहुत अंगीं येणें शक्य आहे.
इतर लोकांस खुश करण्याची संधि कधीं दवडूं नका. सर्वांशी सभ्यपणानें वागा. लेडी मांटेग ह्मणते -" सभ्यपणानें वागण्यास दोन द्यावे लागत नाहींत, पण त्यापासून सर्व कांहीं साध्य होतें.” सभ्यपणापासून जें साध्य होतें, तें पैसा ओतला तरी साध्य होत नाहीं. म्हणून, ज्याशीं ज्याशीं तुमचा संबंध डेल त्याला आपलासा करून घेण्याचा यत्न करा. बलैनें एकदां इलिझाबेथ राणीला असाच उपदेश केला होता – “ प्रजेचीं मनें आपलींशीं करून घ्या; ह्मणजे त्यांचा पैसा व त्यांच्या मनोवृत्ती तुमच्याच झाल्या.”
बळजबरीचें जेथें चालत नाहीं असलीं कामें वारंवार अंगचातुर्यानें करितां येतात. सूर्य आणि वारा ह्या कल्पित गोष्टीचा लिलीनें आपल्या पुस्तकांत उतारा दिला आहे. तो असा - "सूर्य आणि वायु ह्यांच्यामध्यें श्रेष्ठत्वाबद्दल जो वाद झाला, तो फार चांगल्या रीतीनें लिहून ठेविलेला आहे. एक गृहस्थ रस्त्यांतून चालत असतां, त्याचा अंगरखा उडवून न्यावा असें वायूच्या मनांत आलें; ह्मणून जोरानें वाहून तो उडवून नेण्याचा वायु प्रयत्न करूं लागला. तेव्हां तो आंगरखा त्या गृहस्थाच्या अंगाला जास्तच चिकटू लागला. कारण वाऱ्याचा जोर जसजसा