Jump to content

मालेगाव किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालेगावचा किल्ला
नाव मालेगावचा किल्ला
उंची
प्रकार भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव मालेगाव
डोंगररांग मालेगाव
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}



भौगोलिक स्थान

[संपादन]

भुईकोट किल्ला मालेगाव हा नाशिक जिल्याच्या मालेगाव या शहरात मोसम नदिच्या उत्तरेस आहे. नाशिक शहरापासुन हा किल्ला १०४ किमी. अंतरावर आहे. मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध गाव आहे. मालेगाव हे तालुक्याचे गाव असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.

कसे जाल ?

[संपादन]

नाशिकच्या ईशान्य दिशेला मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे.

इतिहास

[संपादन]

इतिहासाचा वारसा जपणाऱ्या मालेगावात मोसम नदीच्या काठावर बलदंड असा किल्ला आहे. हा किल्ला मालेगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.

हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला आहे. इ.स. १७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांनी नमूद केले आहे. एका उल्लेखानुसार १८२० मध्ये मालेगावाचा किल्ला साठ वर्षापूर्वी बांधला असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार हा किल्ला १७६० मध्ये बांधला असावा, असे दिसते.

नारोशंकर हे सरदार होते. ते बराच काळ उत्तर भारतात होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार म्हणून असणारे नारोशंकर पुढे इंदूरचे सुभेदार झाले. त्यांनी ओरछा जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते.

त्यावेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी होता. आलमगीर गाझी शिकारीच्या मोहिमेवर असताना नारोशंकर सोबत होते. बादशहाने शिकारीच्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी हुकली. चवताळलेल्या सिंहाने बादशहावर झेप घेतली. नारोशंकर यांनी झेप घेणाऱ्या सिंहाला तलवारीने मारले, त्यामुळे बादशहा बचावला. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना 'राव बहाद्दूर' हा किताब देऊन मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्यांचा परिसर जहागीर म्हणून दिला.

पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. पेशव्यांबरोबर झालेला बेबनाव मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले. नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्यांकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली होती. मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला.

नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले. नारोशंकर यांच्यावरही उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असावा असे मालेगावच्या किल्ल्याच्या बांधकामावरून दिसते.

किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

मूळ चौरस आकाराचा भक्कम किल्ला आहे. त्याच्या भोवती साधारण ४० ते ४५ फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. या तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक खंदून त्यात मोसम नदीचे पाणी खेळवून किल्ला अभेद्य करण्यात आला आहे.

उत्तराभिमुख असा किल्ल्याचा दरवाजा आहे. तो खंदकावरील पुलाने जोडला आहे. हा मुख्य दरवाजा सध्या मोडकळीला आला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच मूळ किल्ल्याची तटबंदी आहे.

आतील आणि बाहेरील भिंतींमधून फेरी मारता येते. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. आता बाहेरील खंदक हा माती आणि कचऱ्याने भरत आला आहे. त्यात काही भागात वस्तीही झाली आहे.

दारामध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. बाजूला रंगमहाल आहे. त्याचा देखणा दरवाजा आणि त्याच्या लाकडी फळ्या अजून शाबूत आहेत. रंगमहालात नक्षीकाम पहात येते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सर्वात वरच्या बाजूला सुबक बांधणीच्या दोन छत्र्या आहत. उत्तम नक्षीकामाच्या या छत्र्यांचा दगड उन्हापावसाने झिजत चालला आहे.

मालेगाव किल्ल्याचे बलदंड बुरूज, खंदक, दरवाजाची लाकडे यांची वेळीच निगा राखली गेली नाही, तर ते काळाच्या पडद्याआड कधी निघून जातील हे कळणारच नाही.

महत्त्व

[संपादन]

मालेगावचा किल्ला इंग्रजांना लढून घेता आला नाही. तो त्यांनी फितुरीने घेतला.