Jump to content

नाग नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाग नदी
नाग नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश नागपूर जिल्हा, महाराष्ट्र

नाग नदी ही महाराष्ट्राच्या विदर्भातील एक नदी आहे. याच नदीवर नागपूर शहर वसले आहे. दिल्लीचे नागरीकरण पाहून १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्यप्रदेश), छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून, नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले.

प्राचीन काळी या नाग नदीच्या काठी नागवंशाचे लोक रहात असावेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता.

नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास अंबाझरी तलाव (जुने नाव बिंबाझरी तलाव) म्हणतात. हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनगाव मार्गावर आहे. हा बिंबाझरी तलाव, आद्य रघूजी भोसले (इ.स. १७३० ते १७५५) यांच्या बिंबाजी नावाच्या पुत्राने बांधला.

भोसलेकालीन नागनदी

[संपादन]

१८व्या शतकात, नागपूरला जीवन देणाऱ्या या संजीवन नाग नदीचा पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी व धार्मिक कार्यांसाठी उपयोग होत होता. त्या काळात भोसले नरेशाने नाग नदीच्या काठी सुंदर देवळे, राजवाडे, उद्याने, स्मशान, राजघाट आणि काशीबाईचा घाट निर्माण केले. नागपूर शहरातल्या सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येऊन मिळतो. या संगमावर इ.स. १७७९ मध्ये दुसऱ्या रघूजीची आई व मुधोजीची पत्‍नी चिमाबाई हिने महादेवाचे देऊळ बांधले. या संगमावर दुसरे रघूजी आणि परिवार धार्मिक कार्यासाठी जात असत. भोसले राजे विजयादशमीला सकाळी घोडे, हत्तींना संगमावर आंघोळीसाठीआणत. हत्ती बुडू शकेल इतके खोल पाणी संगमावर होते. नदीच्या काठी शस्त्रपूजा आणि शमीची पूजा व्हायची. सायंकाळी भोसले परिवार सीमोल्लंघनासाठी नाग नदी ओलांडून राजाबक्षाच्या मारुतीला जायचा.

संगमावरील महादेवाच्या देवळाचे जोते पाच फूट उंच असून भोवती २२X२५ फुटाचा चबुतरा आहे. दुसऱ्या रघूजीने इ.स. १७७२ च्या सुमारास नाग नदीच्या काठी वेणुगोपालाचे मंदिर बांधले. मंदिरातील शिल्पकाम कलात्मक आहे.

त्या ठिकाणची देखणे शिल्प असलेल्या राधाकृष्णाच्या देवळासह इतर देवळे १९व्या शतकात बुटींनी बांधली. काही देवळे ताराबाई बुटींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. हा परिसर हल्ली बुटीची चाळ किंवा संगम चाळ म्हणून ओळखला जातो.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून धंतोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा पूल तिसऱ्या रघूजीने इ.स. १८३७मध्ये बांधला. संगम पूल या नावाने ओळखला जाई. त्यानंतर नाग नदी पटवर्धन ग्राउंड मोक्षधामावरून वाहते आणि सक्करदरामार्गे जाते. आज तो रस्ता ग्रेट कॅनॉल रोड या नावाने परिचित आहे.

इंग्रज वकील जॉर्ज फॉस्टर (इ.स. १७५२-१७९१) याचे निधन नागपुरात झाले. त्याचे दफन रघूजीने शहराच्या पूर्वेस नदीच्या काठी केले होते. नाग नदीच्या पुराने स्मारकास नुकसान होऊ नये म्हणून पुढे १९१५ साली ती शवपेटी उकरून काढली आणि नागपूर कॅन्टॉन्मेन्टमध्ये, टायगर गॅप ग्राउंडला लागून असलेल्या प्रॉटेस्टन्ट सिमेट्रीत एक थडगे बांधून त्यात ठेवली गेली. त्यावरील शिलालेख रोमन, मोडी आणि फारसी लिपीत आहे.

समाध्या

[संपादन]

नाग नदीच्या काठी डाव्या तीरावर ’शुक्रवारी’ पेठ विभागली गेली होती. एका विस्तृत आवारात भोसले घराण्यातील व्यक्तींसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवलेली होती. त्या आवारात उत्कृष्ट शिल्पकलेने युक्त अशी भोसल्यांची समाधी मंदिरे आहेत. भोसले काळात शुक्रवारीतल्या या परिसराला थडगा नाग म्हणत. पहिले, दुसरे आणि तिसरे रघूजी यांच्या याच परिसरात समाध्या आहेत. दुसऱ्या रघूजीचे पुत्र परमेजी यांची पत्‍नी काशीबाई सती गेल्यामुळे येथील एका देवळाला काशीबाईचे देऊळ म्हणतात. या देवळावरील शिल्प अप्रतिम आहे.

उद्याने

[संपादन]

काशीबाई मंदिरापासून वहात वहात नाग नदी तुळशीबागेजवळून जाते. या ठिकाणी म्हणजे आजच्या सी.पी. अँड बेरार कॉलेजसमोर डावीकडे मोगल शैलीतील मोठी तुळशीबाग आहे. तिची तशीच उजवीकडच्या बेलबागेची निर्मिती दुसऱ्या रघूजीने केली. आज संत्रीनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील पहिली संत्र्याची रोपे दुसऱ्या रघूजीनेच सियालकोट व औरंगाबादहून आणली आणि आधी तुळशीबाग परिसरात आणि नंतर सबंध जिल्ह्यात लावली.

नाग नदीच्या काठी तुळशीबागेतच दुसऱ्या रघूजीने राजवाडा, नाट्यगृह आणि इतर इमारती बांधल्या. या राजवाड्यातच तो दुपारच्या विश्रांतीसाठी येत असे. दिवाळीत नाग नदीच्या तीरावर रोषणाई करण्यात येई, ती पाहण्यासाठी सबंध शहर जमा होत असे.

आजची नाग नदी

[संपादन]

इ.स. १९५६पर्यंत या नदीत कपडेही धुतले जात. महालातील स्त्रिया हरतालिकेच्या गौरी विसर्जनासाठी नदीवर जात. नदी तोवर स्वच्छ होती. १९५६मध्ये नाग नदीच्या काठी देखणे बंगले होते. नदीच्या बाजूने डावीकडे अशोकाची झाडे होती.

या नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे २३५ नाले येऊन मिळतात. यांत पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्‍न चालू असतात.

आपल्या घाणेरड्या पाण्यासह नाग नदी ही भिवकुंड टेकडीजवळ कन्हान नदीला मिळते. या प्रदूषित नदीमुळे गोसीखुर्दचे पाणी दूषित होत आहे व त्याचा प्रभाव वैनगंगा नदीवरही पडत आहे. नाग नदीतून सुमारे ३५० एमएलडी ('मिलियन लिटर पर डे'-प्रतिदिन दहा लाख लिटर) पाणी वाहून ते वरील नद्यांना मिळते. त्यापैकी फक्त २०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया झालेली असते.[]

पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण

[संपादन]

राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरणाने नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचा आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाला नोव्हेंबर २०१९ मध्ये मान्यता दिली आहे. नागपूर महानगरपालिकेने या प्रकल्पाची किंमत रु २४३४ कोटी सांगितली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर असताना प्रकल्पाची चर्चा झाली. नंतर हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला. आघाडीच्या काळात १२६ कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली. त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. प्रकल्पाला विलंब झाल्याने आता किंमत वाढली आहे. नाग नदीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्याची योजना आहे. नदीची लांबी ६८ किलोमीटर असून शहरात १८ किलोमीटर आहे. केंद्र ६० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महापालिकेला १५ टक्के भार उचलावा लागणार आहे. [१]

नदी स्वच्छता अभियानात नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीन नद्यांची स्वच्छता होणार आहे.[] नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च २४३४ कोटी रुपये आहे. ८५ टक्के कर्ज जपान सरकार उपलब्ध करून देणार आहे. महापालिका १५ टक्के गुंतविणार आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सी ८५ टक्के अर्थसाहाय्य करणार आहे. त्यापैकी केंद्र सरकारला ६० टक्के आणि राज्य सरकारला २५ टक्के अर्थसाहाय्य करणार आहे.

नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पानंतर फान्सच्या मदतीने नागनदी दर्शनी भागाचा विकास (नागनदी रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट) प्रकल्प राबविला जाणार आहे. १६०० कोटींचा हा प्रकल्प फ्रान्स सरकारच्या निधीतून राबविला जाईल. फ्रान्सच्या ए.एफ.डी. तांत्रिक संस्थेने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. नदीला लागून पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून फूड फ्लाझा, कॅफेटेरिया व इतर सोयी राहतील. सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प व सौरऊर्जा निर्मितीचादेखील यात समावेश आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.२५/१०/२०१३-हॅलो नागपूर पुरवणी पान क्र. ४ (मथळा-नाग नदीचे किती पाणी शुद्ध करणार?) Archived 2016-01-30 at the Wayback Machine. दि. २५/१०/२०१३ ला १०.२७ वाजता जसे दिसले तसे.
  2. ^ "तुकाराम मुंढेंची भन्नाट आयडिया, लॉकडाऊनचा दुहेरी फायदा, नागपुरातील ३ नद्या २० दिवसात स्वच्छ करणार". टीव्ही९ मराठी. 2020-03-28. 2020-06-12 रोजी पाहिले.
  3. ^ "नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात". लोकमत. 2019-09-24. 2020-06-12 रोजी पाहिले.