ताम्रवृक्ष
ताम्रवृक्ष | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||
पेल्टोफोरम टेरोकार्पम |
ताम्रवृक्ष हा एक सुंदर पिवळ्या फुलांचा, दाट सावली देणारा वृक्ष आहे. ह्या झाडाला पीतमोहर, तांब्याची शेंग अशीही इतर नावे आहेत. ताम्रवृक्ष हा मूळचा श्रीलंका, मलेशिया देशातील[१] पण आता भारतात उष्ण हवामानात सर्वत्र आढळणारा निम- पानझडी वृक्ष आहे. हा वृक्ष भरभर वाढणारा असून ३० मीटर पर्यंत उंची गाठू शकतो.[२]
ताम्रवृक्षाचे खोड करड्या रंगाचे असून सरळ वाढते पण थोडी उंची गाठल्यावर त्याला अनेक फांद्या फुटून त्याचा चांगला विस्तार होतो. माथ्यावर गर्द हिरव्या पानांचे छत्र तयार होते आणि त्यामुळे झाडाखाली चांगली दाट सावली असते.
ताम्रवृक्षाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (bipinnate) प्रकारची असतात. पाने साधारण १५ ते ३० सेंमी लांब असतात. पानाच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना पर्णिकांच्या जोड्या असतात मात्र टोकाला पर्णिका नसते. हिवाळ्यात ह्या झाडाची काही पाने गळून पडतात पण हे झाड निष्पर्ण कधीच होत नाही.[२] वसंत ऋतूत झाडाला तजेलदार हिरव्या रंगाची पालवी फुटते पण काही दिवसातच सर्व पाने गडद हिरव्या रंगाची होतात.
ताम्रवृक्षाला वर्षातून दोनदा म्हणजे मार्च ते मे आणि सप्टेंबर ते डिसेंबर असा बहर येतो.[१] सर्वप्रथम लोखंडाच्या गंजाच्या रंगाचा तुरा येतो त्यांनतर त्यावर त्याच रंगाच्या कळ्या दिसू लागतात. त्यातूनच पिवळ्या धमक रंगाची फुले खालपासून वरपर्यंत उमलत जातात. फुले पाच पाकळ्यांची आणि मंद सुवासिक असतात. मात्र फुले झाडावर फार काळ टिकत नाहीत आणि बहराच्या काळात सुकलेल्या फुलांचा सडा झाडाखाली पडलेला दिसतो.
बहरानंतर ह्या झाडाला गंजासारख्या तांबड्या रंगाच्या शेंगा येतात आणि त्या झाडावर बऱ्याच काळ टिकतात. मात्र शेवटी शेंगांचा रंग बदलून काळसर होतो. शेंगाची लांबी ५ ते १० सेंमी इतकी असते. शेंगांचा आकार काहीसा ढालीसारखा असतो. शेंगांचा जो गंजाप्रमाणे किंवा तांबरलेला रंग असतो त्या रंगामुळे ह्या झाडाला तांब्याची शेंग किंवा इंग्रजीत कॉपर पॉड असेही नाव मिळाले आहे.
हे झाड सुंदर पर्णसंभार आणि चमकदार पिवळ्या फुलांमुळे खूप शोभिवंत दिसते. त्यामुळे आणि त्याच्या गर्द सावलीमुळे रस्त्याच्या कडेला दुतर्फा, शहरात मोठ्या उद्यानांत सर्वत्र लावलेले आढळते. कोको किंवा कॉफीच्या मळ्यातही त्या झाडांना सावली मिळावी आणि त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ही झाडे लावली जातात.[१] ह्या झाडाचे लाकूड फारशा चांगल्या प्रतीचे मानले जात नाही. ताम्रवृक्षाचे संवर्धन त्याच्या बियांपासून किंवा छाट कलमाद्वारे सहज होऊ शकते.[३]
चित्रदालन
[संपादन]-
ताम्रवृक्षाचा बहर
-
ताम्रवृक्षाची पर्णरचना
-
ताम्रवृक्षाच्या कळ्या व फुले
-
ताम्रवृक्षाच्या फुलांचे तुरे
-
ताम्रवृक्षाच्या शेंगा
संदर्भ
[संपादन]- ^ a b c प्रमुख भारतीय वृक्ष - पिप्पा मुखर्जी अनु- शैलजा ग्रब. Mumbai: Oxford University Press. 1993. p. 23.
- ^ a b Field Guide to Common Trees of india - P V Bole, Yogini Vaghani. Mumbai: Oxford University Press. 1986. p. 29.
- ^ फुलझाडे - एम एस रंधावा अनु- व्यंकटेश वकील. New Delhi: National Book Trust, India. 2004. p. 142. ISBN 81-237-3640-1.